Home पॉलिटिकल पोस्ट विलनीकरणास पक्षातील नेत्यांचाच विरोध; राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद टोकाला

विलनीकरणास पक्षातील नेत्यांचाच विरोध; राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद टोकाला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलनीकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, या विलनीकरणाला पक्षातीलच नेत्यांचा तीव्र विरोध असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील नेत्यांनी विलनीकरणास स्पष्ट विरोध दर्शविला आहे.

शरद पवार गटातील नेत्यांना सत्तेत महत्त्वाची पदे देण्यास अजित पवार गटाचा सक्त विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अजित पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती आणि १२ फेब्रुवारीचा मुहूर्तही ठरला होता, असा दावा शरद पवार गटातील नेत्यांकडून करण्यात आला होता.

मात्र, त्या काळातही अजित पवार गटातील प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विलनीकरणाला विरोध केला होता आणि आजही त्यांची भूमिका बदललेली नाही. अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या बैठकीत या गटाने पुन्हा एकदा विलनीकरणास विरोधी भूमिका घेतली.

दरम्यान, पवारांच्या निधनानंतर विलनीकरणाच्या चर्चांवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी वेगळाच सूर लावला आहे. भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांनाच घ्यावा लागेल, असे सूचक विधान तटकरे यांनी केले आहे.

राष्ट्रवादीतील नेत्यांचा वाढता विरोध लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वादात उडी घेत नकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलनीकरणाचा विषय सध्या तरी गुंतागुंतीचा आणि अनिश्चिततेत अडकलेला असल्याचे चित्र आहे.