पोहरा (भंडारा) : मंडई व भाऊबीजेच्या मुहूर्तावर शिव मराठा ग्रुप पंचवटी चौक, पोहरा येथे ‘ए वन लावणी व डान्स शो’चे भव्य आयोजन करण्यात आले. नृत्य, संगीत आणि रंगमंचीय सादरीकरणांच्या मनमोहक संगमाने ग्रामस्थ आणि पाहुण्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
मंडई कार्यक्रमाचे उद्घाटन शारदा मुकेश मते (पंचायत समिती सदस्य, लाखनी) यांच्या हस्ते करण्यात आले. रंगमंच पूजक विवेक गिऱ्हेपुंजे (अध्यक्ष तंटामुक्त समिती, पोहरा), सहउद्घाटक यशवंत खेडीकर (सदस्य, ग्रामपंचायत पोहरा), अध्यक्ष रामलाल पाटणकर (सरपंच, ग्रामपंचायत पोहरा) तसेच ‘ॲट पोस्ट मराठी’चे पंकज पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
भंडारा जिल्ह्यातील पोहरा हे गाव सांस्कृतिक वारसा जोपासणारं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी झाडीपट्टी कलाकारांना येथे सांस्कृतिक मंच उपलब्ध करून देण्यात येते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ मिळणे ही खरी सामाजिक प्रगती असल्याचे मत व्यक्त केले. तसेच आयोजकांचे कौतुकही केले.
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रेक्षकांनी लावणी व नृत्य सादरीकरणांचा मनसोक्त आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय सैनिक नितीन शिवणकर, गणपत येलमुले, शुभम गरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
झाडीपट्टीतील कलाकारांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून देणे, गावात एकता निर्माण करणे आणि मनोरंजनातून प्रबोधन साधणे हा यामागचा प्रमुख उद्देश होता. नितीन शिवणकर व त्यांच्या शिव मराठा ग्रुपने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करून प्रेक्षकांची मनं जिंकली.
याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना संदीप कामथे यांनी मांडली. तर सूत्रसंचालन लखन साखरे आणि प्रणय सहदेवकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रतन पाटणकर यांनी केले. या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.










