नागपूर : शेतकरी, कामगार आणि दिव्यांगांच्या प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू नेहमीच संघर्ष करतात. बच्चू कडू यांचे सध्या राज्यभर सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. या आंदोलनाला सध्या कसं स्वरूप प्राप्त होत आहे हे जळगाव जिल्ह्यातून आलेल्या एका व्हिडिओमधून आपल्या लक्षात येईल… केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी बच्चू कडू आक्रमक झालेले दिसले. आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी भेटायला न आल्यानं आंदोलनकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला.
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करी
मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला जाणार होता. परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊन बरेच महिने उलटूनही सरकारकडून या आश्वासनांची पूर्तता केली जात नाहीत. म्हणून बच्चू कडू यांनी मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
यात कर्जमाफीसह शेतमजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ यासह अनेक मागण्यांसाठी गुरूकूंज मोझरी येथे हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती . आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही. अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी केला होता.
शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसामधे उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्ज माफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तसेच थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. मात्र ते आश्वासन अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यां
त्याचाच एक भाग म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जळगाव येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. आंदोलनकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी निघाले होते. मात्र जिल्हाधिकारी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयातून बाहेर न आल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाचा गेट उघडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर कार्यालय परिसरात मोठा गदारोळ झाला.
बच्चू कडू यांचं राज्यभर आंदोलन सुरू आहे. २ ऑक्टोंबर पर्यंत ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारनं बच्चू कडू यांना दिलं होतं. मात्र त्यावर अजूनही काही हालचाल झालेली दिसून येत नाही. असे असले तरी जोपर्यंत सात बारा कोरा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. त्यामुळे नेमकं हे आंदोलन कुठल्या दिशेनं जाईल, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.









