Home City post भारताने हॉकीत पटकवला ‘आशिया चषक’

भारताने हॉकीत पटकवला ‘आशिया चषक’

थेट विश्वचषक स्पर्धेत प्रवेश : कोरियाला नमवून चौथ्यांदा पटकावला आशिया चषक

नागपूर : संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियामधील ताकद दाखवून देताना रविवारी दिमाखात आशिया चषक पटकावला. भारताने चौथ्यांदा आशिया चषक उंचावला. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या दक्षिण कोरियाचा ४-१ असा धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह भारताने पुढील वर्षी बेल्जियमनेदरलँड्स यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली.

भारताकडून दिलप्रीत सिंगने २, तर सुखजीत सिंग आणि अमित रोहिदास यांनी प्रत्येकी एका गोल केला.कोरियाकडून सोन डायन याने एकमेव गोल केला. जोरदार सुरुवात केलेल्या भारताकडून अवघ्या २९व्या सेकंदाला सुखजीतने गोल केला. या धमाकेदार सुरुवातीनंतर भारतीय खेळाडूंनी कोरियावर जबरदस्त दडपण आणले. मनप्रीतकडून मिळालेल्या पासवर सुखजीतने गोल केला. यानंतर नवव्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करण्यात जुगराजसिंग अपयशी ठरला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी सुरुवातीच्या ७-८ मिनिटांपर्यंत तोडीस तोड खेळ केला. मात्र, यानंतर भारताने आपला वेग वाढवला आणि २८व्या मिनिटाला संजयकडून मिळालेल्या पासवर दिलप्रीत सिंगने शानदार मैदानी गोल करत भारताला मध्यंतराला २-० अशी आघडी मिळवून दिली.

तिसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांनी आक्रमक खेळ खेळला. ४०व्या आणि ४१व्या मिनिटाला कोरियाने पेनल्टी कॉर्नर मिळवले; परंतु भारतीयांनी त्यांना गोलकरण्या पासून रोखले. भारतालाही ४४व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आला नाही. मात्र, ४५व्या मिनिटाला दिलप्रीतने अप्रतिम गोल करत भारताला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून देत कोरियावर पूर्ण दडपण आणले.

कोरियावर दडपण

चौथ्या क्वार्टरमध्ये कोरियावरील दडपण दिसून आले. त्यांनी आक्रमण करत पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण भारतायांनी जोरदार प्रत्युत्तर देत आक्रमण परतवून लावले. त्यातच, ५०व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर अमित रोहिदासने गोल करत भारताला ४-० आघाडी मिळवून दिली. यानंतर कोरियाने ५१व्या मिनिटाला पहिला गोल करत १-४ अशी पिछाडी एका गोलने कमी केली. 

मलेशियाने जिंकले कांस्य 

अंतिम सामन्याआधी झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मलेशियाने शानदार आक्रमक खेळ करताना चीनचा कडवा प्रतिकार ४-१ असा मोडला. अखिमुल्लाह अनौर याने २ गोल करत मलेशियाच्या विजयात छाप पाडली. नोरस्याफिक सुमंत्री याने आठव्याच मिनिटाला गोल केल्यानंतर अखिमुल्लाह याने ३६व्या आणि ५०व्या मिनिटाला गोल करत मलेशियाला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.