कोणीही दोषी असो, कडक शिक्षा होणारच; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही!

xr:d:DAFZO7QIXTY:3472,j:355078994840858940,t:24030314

जळगाव : महाराष्ट्र आणि देशात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बदलापूर, नागपूर, कोळपर, अकोला या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विरोधक यावरून सरकारला धारेवर धरत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) प्रथमच महिला अत्याचाराविरोधात भाष्य केले आहे. कोणीही दोषी असो, त्याला कडक शिक्षा होणार अशी ग्वाही मोदींनी दिली.

नरेंद्र मोदी हे आज (२५ ऑगस्ट) जळगाव येथील जाहीर सभेत आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार हे नेहमीच महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे, असे स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या आणि राज्याच्या कायम सोबत आहे. मी प्रत्येक राज्य सरकारला आवाहन करतो की, महिलांवरील हिंसा अक्षम्य पाप आहे. त्यामुळे दोषी कुणीही असला तरी तो सुटता कामा नये. त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणारे सुटता कामा नये. रुग्णालये असो, शाळा असो, कार्यालये असो किंवा पोलीस प्रशासन, ज्या पातळीवर कामचुकारपणा होईल, त्या सगळ्यांचा हिशोब व्हायलाच हवा. तसेच, आपल्या महिला आणि मुलींच्या वेदना, त्यांचा राग मला समजत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा!

महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी आमचे सरकार कडक कायदा करत आहेत. आधी अशी तक्रार यायची कि, वेळेत एफआयआर (FIR) होत नाही, सुनावणी होत नाही, खटला उशीरा सुरू होतो, निर्णय सुद्धा उशिरा येतो, मात्र आता भारतीय न्याय संहितेतून या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. नव्या कायद्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाच्या नावाने मुलींची फसवणूक केली जायची. त्यावर शिक्षा होत नव्हती. आता यावर आम्ही कायदे केले आहे. सरकार येतील आणि जातील. परंतु महिलेच्या सन्मानाचे रक्षण, हे समाज आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, असे आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी केले.