मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत षण्मुखानंद सभागृहात झाला. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी संविधानाच्या विषयावर पुन्हा एकदा भाष्य केले असून या मेळाव्यात नाना पटोले यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आता जोरदार तयारी सुरु केली असून, मुंबईमध्ये आज (१६ ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजता पासून सुरू असलेला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. तसेच या मेळाव्यामध्ये, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, सुप्रिया सुळे हे सर्वच जणांनी मार्गदर्शन केले.
काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्रावर जे संकट आहे, त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल, यासंबंधीची दिशा महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्या शहरांमधील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही सभा आहे. महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल, कारण अजूनही देशावरचे संकट पूर्णपणे गेले असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आपण संविधानाबद्दल भूमिका मांडली. मी जबाबदारीने सांगतो लोकसभेत आपल्याला काही प्रमाणात यश आले पण संविधानावरील संकट पूर्णपणे गेलेले नाही. कारण देशाची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत. त्यांची संविधानात्मक संस्था आणि विचारधारेवर आस्था नाही, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका!
आज देशाच्या संसदेत आम्ही पाहतो, देशाचे पंतप्रधान या संसदेची प्रतिष्ठा किती ठेवतात. आता हल्लीच अधिवेशन झाले. लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान एकदाही सभेत आले नाहीत. त्या सदनाची किंमत, त्याची प्रतिष्ठा, त्याचे महत्व याकडे ढुंकूनही न बघण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांची असून, त्याची प्रचिती आम्हाला वारंवार येत आहे, असे शरद पवार म्हणाले.
नाना पटोले काय म्हणाले?
आज प्रचाराचा नारळ फुटला. राज्याचे सरकार घाबरलेले आहे. रोज काहीतरी नवीन GR काढतात. मोर्चा काढला तर गुन्हे दाखल होतात, दिल्लीच्या सरकारचे ATM महाराष्ट्रात असल्याचे दिसते असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.