बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट; हसीना शेख यांचा तडकाफडकी राजीनामा देऊन भारतात एन्ट्री!

बांगलादेश मधील हिंसक निदर्शने सुरू असताना शेख हसीना (shekh hasina) यांनी पंतप्रधान पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. बांगलादेश मध्ये आज झालेल्या हिंसाचाराच्या नवीन घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी हजारो आंदोलकांनी राजधानीच्या दिशेने आगेकूच केली. आंदोलकांनी ढाका येथील पंतप्रधान हसीना यांच्या राजवाड्यावर हल्ला केला. तेथील, होणाऱ्या हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, लोक रस्त्यावर उतरले आहेत. सर्वत्र हिंसाचार होत आहे.

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याविरोधात सुरु असलेले हिंसक आंदोलन पाहता त्यांनी देश सोडला असून त्या विशेष हेलिकॉप्टरने आता भारतात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, बांगलादेशमध्ये अंतर्गत कलहामुळे शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिलाच.

बांगलादेश मधील परिस्थिती काय?

बांगलादेशमध्ये गेल्या दोन दिवसात हिंसाचार फार वाढला आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत येथील लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलक आणि सत्ताधारी समर्थकांमध्ये हाणामारी देखील झालीय. आंदोलन इतके हिंसक झाले की पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट सुरु झाली. यात, अनेक पोलिसांना आपला जीवही गमवावा लागला. देशात कर्फ्यूला झुगारुन आंदोलक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले असून आतापर्यंत हिंसाचारात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

हे नेमके प्रकरण काय?

बांगलादेश मधील विद्यार्थी संघटना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनी शेख हसिना यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. या सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबत गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र शेख हसीना यांनी या विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटले. तसेच आंदोलकांसोबत कडक कारवाई करण्याबाबत आदेशही दिले होते; परंतु त्यानंतर या देशात हिंसाचार आणखीनच वाढला आणि तेथील जनतेनी हसीना शेख यांना देश सोडण्यास मजबूर केले.