बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची सिक्युरिटी टाईट; झेड प्लस सुरक्षेसाठी केंद्राची विनंती काय?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणानंतर केंद्रीय यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय एजन्सीने संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. त्यानंतर ही एजन्सी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा घ्यावी यासाठी संपर्क साधणार आहे. केंद्रीय यंत्रणांनी याआधीही पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली होती मात्र पवारांनी तेव्हा नकार दिला होता. आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा संपर्क केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीआरपीएफ शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा घ्यावी यासाठी विनंती करणार आहे. आता शरद पवार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार. गेल्या वेळी शरद पवारांना ज्यावेळी सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी मोठे राजकारण झाले होते. शरद पवारांनी देखील केंद्रीय यंत्रणांना कारणे विचारली होती. मात्र सुरक्षा देण्याचे कारण त्यावेळी गुप्त ठेवण्यात आले होत.

सुरक्षा घेण्यास शरद पवारांचा नकार!

याआधीही शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. मात्र तेव्हा ही सुरक्षा घेण्यास शरद पवार यांनी नकार दिला होता. तसेच, सुरक्षा दलाचे वाहन घेण्यासही पवारांनी नकार दिला होता. मात्र सुरक्षा वाढवण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त केला होता. १५ सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली होती, तरी पवार यांनी सुरक्षा नाकारली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणा आग्रह करणार असल्याचे बोलले जात आहे.

Z-Plus दर्जाची सुरक्षा म्हणजे काय?

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अति-महत्वाच्या व्यक्तींना X, Y, Y Plus, Z, Z Plus दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येते. या सुरक्षा यंत्रणेत मनुष्य बळ आणि वाहनांच्या ताफा यात काही मुलभूत फरक असतो. या व्यतिरिक्त आणखी एक एसपीजी सुरक्षा पुरविली जाते. ही सुरक्षा केवळ देशांच्या पंतप्रधानांना पुरविली जाते. त्यानंतर झेड प्लस दर्जाच्या सुरक्षा श्रेणीचा क्रमांक लागतो. प्रत्येक दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेतील ताफ्यात असणाऱ्या जवानांची संख्या वेगवेगळी असते.