…तर बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था करु; सलमान खानला व्हॉटसअप वरून धमकी, ५ कोटी रुपयांची मागणी!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने खळबळ उडाली असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असलेल्या बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई सोबतच शत्रुत्व संपवण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी करत खंडणी न दिल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था करु, अशा धमकीचा मेसेज वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप वर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान, माहितीनुसार आरोपींनी पाकिस्तानातून M16, AK 47, AK 92 ची खरेदी करण्याचा बेत आखला होता. सिद्धू मुसेवाला याची ज्या पिस्तुलाने हत्या केली, त्याच पिस्तुलाचा वापर करत सलमानला जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपी करणार होते. इतकेच काय, तर त्यांनी सलमानच्या सर्व हालचालींवर लक्ष देखील ठेवले होते. जवळपास ६० ते ७० लोक त्याच्या घरावर पाळत ठेवून होते.

पैसे दिले नाहीत तर सलमान अवस्था….

सलमान खानला धमकी देणाऱ्याने ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट होईल, अशी धमकी त्याने दिली आहे. सध्या मुंबई पोलीस मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. सलमानचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या झाली होती. अशातच आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एका संशयिताला अटक!

सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकतेच हरियाणातील पानिपत येथून एका संशयिताला अटक केली आहे. सुक्खा कालूयाला असे त्याचे नाव असून पनवेल शहर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. सलमान खान याच्या फार्म हाऊसची रेकी करणे आणि जीवे मारण्याची सुपारी घेतल्या प्रकरणी सुक्खा कालूयाला वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुक्खा कालूयाला हा बिष्णोई गँगचा शार्प शुटर असून तो अनेक महिन्यापासून फरार होता. आज सुक्खा कालूयाला पनवेल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी आणि अभिनेता सलमान खान यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वांनाच माहिती आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण आणि आता पुन्हा आलेला धमकीचा मेसेज यामुळे अभिनेता सलमान खानला आता Y+ सुरक्षा देण्यात येणार आहे. त्याच्या सुरक्षेसाठी सुमारे २५ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या २५ सुरक्षारक्षकांमध्ये २ ते ४ NSG कमांडो आणि पोलिस सुरक्षा कर्मचारी राहणार आहेत. याशिवाय दोन ते तीन पोलिस वाहनांचा ताफा सलमान खान सोबत असणार आहे. या वाहनांच्या ताफ्यात सलमान खानसाठी एका बुलेटप्रूफ वाहनाचा देखील समावेश असणार आहे.