राहुल गांधीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे गायकवाडांना चांगलेच महागात पडले; १९२ अंतर्गत गुन्हा दाखल!

बुलढाणा : विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणे शिवसेना आमदाराच्या चांगलेच अंगाशी आले आहे. बुलढाण्यातील काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. काँग्रेसने ४ तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा पोलिसात कलम १९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले. सध्या राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया काय?

संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला धडा शिकवण्याकरता गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे. तसेच, जे स्टेटमेंट मी केले आहे त्याची मी माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील? मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी आरक्षण संपवणाऱ्याबद्दल जे वक्तव्य केले त्यावर ठाम आहे. काँग्रेसने ७० कोटी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्लानिंग केले आहे. काँग्रेस पेक्षा मोठी आंदोलने आम्ही केली आहेत. आम्हाला देखील दहा-दहा हजार माणसे आणून आंदोलन करता येते, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणावरून आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिंदेजी वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा, ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्याने राहुल गांधींवर बोलूच नये. गायकवाडने आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत आहे, असे ते म्हणाले.

गायकवाड यांच्या वक्तव्याचे भाजप समर्थन करत नाही!

भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांच्या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे सांगितले. बावनकुळे यांनी गायकवाड यांच्या वक्तव्यावरून भाजपला दूर सारले.