Home महाराष्ट्र पोस्ट नागपूर पोस्ट पिकं जळतायत, अधिकारी झोपेत! सोनेगावच्या शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक

पिकं जळतायत, अधिकारी झोपेत! सोनेगावच्या शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक

कळमेश्वर :  तालुक्यातील सोनेगाव शिवारात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जाब विचारला. सततच्या वीजखंडितामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी w सापडले आहेत.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतातील वीजपुरवठा सतत बंद पडत असल्यामुळे सिंचनाची कामे ठप्प झाली आहेत. परिणामी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसून उत्पादनावर गंभीर परिणाम होत आहे. याशिवाय, संबंधित विद्युत सहाय्यक वेळेवर हजर राहत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, सहाय्यकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा मोबाईल बंद येतो. फोन उचलला तरी समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.

मोर्चेकऱ्यांनी संबंधित विद्युत सहाय्यकाची बदली करण्यात यावी तसेच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केली. वीजपुरवठा नियमित झाल्यास गावचा पाणीपुरवठाही सुरळीत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.