नागपूर : संघ आणि भाजप यांच्यातील वैचारिक संबंधांवर देशभरात नेहमीच चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि वक्ते निनाद दीक्षित यांनी संघ आणि भाजप यांच्या विचारधारेत मोठा फरक असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.निनाद दीक्षित म्हणाले, “मी संघात होतो हे खरे आहे. मात्र संघ आणि भाजप या दोन्ही संघटनांच्या विचारांमध्ये प्रचंड तफावत आहे. भाजपची स्थापना समाजवादी विचारांवर झाली होती, तर संघाचा विचार पूर्णपणे वेगळा आहे.”
धर्माच्या नावावर राजकारण नको
भाजप आणि संघ यांची विचारधारा एकच असल्याचे काही जण सांगतात, मात्र हा दावा चुकीचा असल्याचे दीक्षित यांनी नमूद केले. “भाजपचे लोक जर असे म्हणत असतील की संघ उजव्या विचारांचा आहे, तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. संघ उजव्या विचारांचा आहे असे सांगितले जाते, पण माझा त्यावर विश्वास नाही,” असे ते म्हणाले.
दीक्षित यांनी भाजपवर टीका करत सांगितले की, पक्षाची भूमिका एका विशिष्ट संप्रदायापुरती मर्यादित असल्याचे दिसून येते. “भाजपची टोकेची भूमिका आजच्या तरुणाईला मान्य नाही. सध्याच्या राजकारणात हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, भाजप जर भांडवलशाहीला प्राधान्य देणारा पक्ष नसता, तर देशातील सामान्य जनतेला अधिक सक्षम पर्याय उपलब्ध झाला असता.










