Home महाराष्ट्र पोस्ट लेखी आदेश नाही, तरी वेतन रोखले! विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षक आंदोलनाच्या तयारीत

लेखी आदेश नाही, तरी वेतन रोखले! विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षक आंदोलनाच्या तयारीत

मुंबई  :  मुंबईतील विशेष शाळांमधील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांचे वेतन कोणतेही शासकीय लेखी आदेश नसताना थांबविण्यात आले आहे. दिव्यांग कल्याण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडून हा निर्णय घेण्यात आल्याने अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. शासनाच्या पटनिर्धारण प्रक्रियेनुसार विशेष शाळांमधील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. मात्र शाळा संहितेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांचे वेतन मूळ शाळेतून सुरू ठेवण्याची स्पष्ट तरतूद आहे.
असे असतानाही मुंबई उपनगरातील अनेक विशेष शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतन अचानक थांबविण्यात आले आहे. मुंबईप्रमाणेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात आल्याची माहिती शिक्षक भरती संघटनेने दिली आहे. वेतन थांबविण्याबाबत शासनाकडून कोणतेही लेखी आदेश नसताना जिल्हा स्तरावर हा निर्णय घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरती संघटनेने दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. वेतन त्वरित सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला आहे.