नागपूर : पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेल्या आरोपीने थेट पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अटक झालेल्या तरुणाने गुरुवारी पहाटे, पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातून अटक करून नागपुरात आणण्यात आलेल्या या आरोपीच्या मृत्यूने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नागेंद्रकुमार रामजी भाटीया (वय १९, रा. हांडीया, जिल्हा प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, नागपूरमधील जरीपटका परिसरातील एका अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामद्वारे त्याची ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर नागेंद्रकुमार मूळ गावी पळून गेल्याने, मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रयागराज पोलिस पथकाच्या मदतीने नागेंद्रकुमारला अटक केली होती. बुधवारी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास नागेंद्रकुमारने झोपेतून उठून चादरीपासून दोरी तयार करत गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले. सकाळी एक पोलीस कोठडी तपासण्यासाठी गेला असता, तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.
या प्रकरणात कर्तव्यावर असलेल्या सहा पोलिसांसह विद्यमान वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू म्हणजे गंभीर निष्काळजीपणा, अशी चर्चा परिसरात सुरू असून, या प्रकरणाचा सखोल तपास होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पीएसआयसह तीन कर्मचारी निलंबित
प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू झाली आहे. कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. अशात पोलिसांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यातील एक पीएसआय आणि तीन पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.










