Home क्राईम पोस्ट बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार, ग्रामस्थांनी रास्ता रोको करत गाड्यांची केली तोडफोड

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार, ग्रामस्थांनी रास्ता रोको करत गाड्यांची केली तोडफोड

नागपूर : जिल्ह्यातील वन्यप्राणी आणि मानवी संघर्षात आज चिमुकल्याचा बळी गेला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इटियाडोह धरण जवळील असलेल्या ग्राम संजयनगर ( बंगाली कॅम्प) येथे बिबट्यानं चिमुकल्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अंश प्रकाश मंडल (वय 5 वर्षे) हा चिमुकला ठार झाला.

अंश मंडल हा चिमुकला आजी अर्चना मंडल यांच्यासोबत 25 सप्टेंबरच्या पहाटे 5 वाजण्याच्या सुमाराला लघुशंकेकरिता घराच्या बाहेर अंगणामध्ये आला. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्या 5 वर्षे चिमुकल्यावर हल्ला केला. बिबट्यानं चिमुकल्याच्या मानेला पकडून फरकटत नेलं. चिमुकल्याच्या आजीनं आरडाओरडा केला. तेव्हा परिसरातील लोकांनी धाव घेतली. आवाजाच्या दिशेनं लोकांनी धाव घेतली असता बिबट्यानं चिमुकल्याला सोडून धूम ठोकली.

केशोरी- नवेगाव मार्ग पूर्णपणे बंद, रास्ता रोको

जखमी मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे नेले. मात्र, त्या चिमुकल्याला मृत्यू झाला असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंकू मंडल यांनी सांगितलं. घटनेची माहिती वन विभागाला आणि पोलीस विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरीकडून देण्यात आली आहे. 5 वर्षे चिमुकल्याला बिबट्यानं मारल्याची घटना समजताच नागरिक संतप्त झालेत. सकाळी सात वाजल्यापासून संजय नगर येथील सर्व महिला-पुरुष एकत्र आले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीकरिता ग्रामस्थांनी मुख्य रस्ता केशोरी- नवेगाव मार्ग पूर्णपणे बंद करून रास्ता रोको आंदोलन केलं.

बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी-पीडित मुलाचे वडील एक दिवसापूर्वीच कामासाठी गुजरात येथे गेले होते. तर मुलाची आई आपल्या माहेरी गेलेली होती. हल्ला केलेल्या बिबट्याला लवकरात लवकर पकडावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. 29 ऑगस्ट 2025 ला इटियाडो धरण येथे फिरायला कुटुंबातील 4 वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला होता. 2024 मध्ये गोठणगाव येथे मंडई उत्सव सुरू असतानाच सायंकाळी साडेपाच वाजता अंगणात असलेल्या लहान मुलावरसुद्धा हल्ला केल्याची घटना घडली होती. संजयनगर, बोंडगाव येथे खूप वेळा बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थांनी अनेकदा जोरजोरात आवाज देऊन बिबट्याला परत लावलं आहे. बिबट्यांच्या बंदोबस्त करावा, असे वन विभागाला कित्येक वेळा परिसरातील ग्रामस्थांनी सांगितलं आहे. असे असतानासुद्धा वन विभागानं याकडे दुर्लक्ष दिल्यानं ग्रामस्थांचा वन विभागाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे.