Home आतंरराष्ट्रीय पोस्ट जेमिनीला कसे कळले, तिच्या शरिराच्या ‘या’ भागात तीळ आहे? तुम्हीही सावध रहा

जेमिनीला कसे कळले, तिच्या शरिराच्या ‘या’ भागात तीळ आहे? तुम्हीही सावध रहा

नागपूर : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून नवीन नवीन ट्रेंड सुरू आहेत. त्या ट्रेंडच्या मागे तुम्ही देखील तर नाही ना लागले? जर हे ट्रेंड तुम्ही फॉलो करत असाल तर आताच सावध व्हा, कारण हा ट्रेंड तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. ते कस?

तर सध्या सोशल मीडियावर दोन नवे ट्रेंड्स वेगाने लोकप्रिय होत आहेत – गूगल नॅनो बनाना व विंटेज साडी एआय एडिट्स. आपल्या साध्या सेल्फीला ३-डी कार्टूनसारखा लुक देणारा नॅनो बनाना ट्रेंड आणि जुन्या काळातील पारंपरिक साडी, सिनेमाची पार्श्वभूमी देणारा विंटेज साडी लुक या ट्रेंडमुळे अनेक महिला गुंतल्या आहेत. या ट्रेंडमध्ये तुम्ही तुमच्या कोणत्याही फोटोला जुन्या काळातील पारंपरिक साडीमध्ये रूपांतरित करू शकता. यामुळे वापरकर्त्याचे फोटो नवे भासतात. पण या ट्रेंडला घेऊन आता मात्र लोकांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे, कारण या ट्रेंड्समुळे प्रायव्हसी व डेटा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहेत.

ट्रेंडमुळे झालेल्या घटना

एक घटना आंध्र प्रदेशातून समोर आली आहे. ज्यात नॅनो बनाना ट्रेंडच्या नावाखाली एका व्यक्तीची ७० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. यामध्ये परत एक घटना समोर आली आहे आणि हे एक चिंतेचे कारण दिसून येत आहे. एका इंस्टाग्राम युजरने सांगितले की, तिला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा एआय-जनरेट केलेल्या प्रतिमेत तिच्या शरीरावर एक तीळ होता, जो तिने प्रॉम्प्टमध्ये उल्लेख केला नव्हता. “जेमिनीला कसे कळले की तिच्या शरीराच्या या भागात तीळ आहे? आणि जेमिनी हा तीळ पाहू शकतो… हे खूप भयानक आहे, हे कसे घडले याचा अंदाज तिलाही नाही.” या घटनेनंतर तिने तिच्या फॉलोअर्सना एआय प्लॅटफॉर्मवर फोटो अपलोड करताना काळजी घेण्याचे आवाहन केले.

आपल्या माहितीचा गैरवापर नेमका होतो तरी कसा?

तज्ञांच्या मते, कोणतेही ॲप किंवा वेबसाइट वापरताना फोटो अपलोड केल्यास त्यात लोकेशन, डिव्हाइसचे नाव, वेळ यांसारखी माहितीही कंपन्यांकडे जाऊ शकते. अधिकृत ॲप्स काही प्रमाणात सुरक्षित असले तरी बनावट ॲप्स किंवा वेबसाइट्स वापरल्यास माहितीचा गैरवापर होऊ शकतो.

फोटो कसे सुरक्षित ठेवता येतील?

  • वैयक्तिक फोटो, कुटुंबियांची खासगी चित्रे किंवा मुलांचे फोटो अपलोड करू नका.
  • फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यातील लोकेशन, वेळ आदी माहिती डिलीट करणे अजिबात विसरू नका.
  • पोस्ट करताना प्रायव्हसी सेटिंग्स तपासा आणि निवडक लोकांनाच पाहता येतील याची खात्री करा.
  • प्लॅटफॉर्म तुमचे फोटो ट्रेनिंग डेटासाठी वापरणार नाहीत, याच्या अटी-शर्ती वाचा आणि नीट समजून घ्या.
  • आणि ५वे म्हणजे, जर फोटो सार्वजनिक झाला तर कोणीही डाउनलोड करू शकतो याची काळजी घ्या. या सर्व गोष्टींचा विचार करूनच फोटो अपलोड करा.