नागपूर : गुरे जंगलात चारून गावाकडे परत येत असताना जंगलातून अचानक रानटी हत्ती निघाले. कळपातील एका हत्तीने समोर आलेल्या गुराख्याला सोंडेने उचलून रस्त्यालगत पाटात आदळले. त्यानंतर पायाने तुडवून जागीच ठार केले. ही ह्रदयद्रावक घटना पोर्ला वनपरिक्षेत्रात चुरचुरा बिटातील जंगलात बुधवारी सायंकाळी ४ः३० च्या सुमारास घडली.
वामन मारोती गेडाम (६२) रा. चुरचुरा (मालगुजारी) असे हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. गेडाम नेहमीप्रमाणे स्वमालकिची गुरे चारण्यासाठी चुरचुरा-पिपरटोला जंगलात सकाळी ११ च्या सुमरास गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा लहान भाऊ महादेव गेडाम व हिरोबी खोब्रागडे हेसुघध्दा होते. त्या दोघांचीही जनावरे चराईसाठी होती. चुरचुरा-पिपरटोला मर्गाच्या कडेला गुरे चारल्यानंतर सायंकाळी गुरे घराकडे घेऊन येत असताना जंगलातून दक्षिण दिशेने अचानक हत्ती निघाले. तेव्हा महादेव गेडाम व हिरोबी खोब्रागडे हे जिवाच्या आकांताने पळाले. मात्र, वामन गेडाम हे हत्तीच्या तावडीत सापडल्याने गेडाम हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोर्लाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. सायंकाळी ७ वाजता शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
अन् अंदाज चुकला
वामन गेडाम व त्यांच्या सोबत्यांना हत्तींचा कळप रस्ता ओलांडून गेला, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी गावाच्या दिशेने गुरे वळविली व ते पिपरटोला-चुरचुरा रस्त्यानेच गावाकडे परत येत होते. मात्र, काही हत्ती जंगलात होते.
यापैकीच हत्तींनी वामन गेडाम यांना चिरडून ठार केले. वामन व त्यांच्या सोबत्यांनी संपूर्ण हत्ती उत्तर दिशेने गेल्याचा अंदाज लावला होता, मात्र तो चुकल्याने ही ह्रदयद्रावक घटना घडली.










