Home City post ‘गणराया’च्या स्वागतासाठी नागपूरकर उत्साही

‘गणराया’च्या स्वागतासाठी नागपूरकर उत्साही

नागपूरः विघ्नहर्ता श्री गणेशाचे आज घरोघरी आगमन होत आहे. त्यासाठी मंगळवारी दिवसभर बाजारपेठेत झुंबड उडाली. अरुंद गल्लीपासून ते विस्तीर्ण चौकांपर्यंत, शहरातील गणेश मंडळे बापाच्या आगमनापूर्वी त्यांच्या मंडळांना अंतिम रूप देण्यासाठी वेळेशी स्पर्धा करत होते. लहान-मोठ्या मंडळांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोशात वाजतगाजत गणेशमूर्ती नेल्या. आज बाप्पाचे प्रतिष्ठापना होणार असून पुढील ११ दिवस शहरात गणेशोत्सवाचा उत्साह राहणार आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरात पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे.

एकूण १४०० गणेश मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी केली आहे. दोन दिवस आधीपासूनच मूर्तीची बाजारपेठ असलेली चितारओळ गर्दीने फुलून गेली. वाहातूक कोंडी टाळण्यासाठी अनेक मंडळांनी कालपासूनच मूर्ती नेणे सुरू केले. विविध निवासी संकुलात गणोशोत्सवाची जोरात तयारी करण्यात आली आहे. नागपूरच्या राजाचे कालच आगमन झाले. आज त्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य आणि प्रसादाच्या खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे. मातीच्या मूर्तींची किंमत अधिक आहे. अनेक मंडळांनी विविध तीर्थस्थळांचे देखावे तयार केले आहेत. विद्युत दिव्यांच्या तोरणांनी ठिकठिकाणचे रस्ते सजले आहेत. विशेष म्हणजे, यावर्षा गणेशोत्सव ११ दिवस चालणार आहे.

प्रतिष्ठापनेचा मुहूर्त

महाराष्ट्रीय पंचांगकर्त्या ज्यो. विद्या राजंदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा मध्यान्हापर्यंत करावी, असा शास्त्र संकेत आहे. सूर्योदयापासून दुपारी १ वा. ३० मि. पर्यंत गणेश स्थापनेचा मुख्य काळ आहे. यावर्षी गणेश चतुर्थीला दुपारी ३ वा. ४३ मिनिटापर्यंत भद्रा आहे. परंतु, गणेश स्थापनेस भद्राची अडचण नाही. त्यामुळे सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत स्थापना व पूजन करता येईल.