नागपूर : सुरक्षित आणि स्वादिष्ट आहारासाठी परंपरागत बियाणेच सुयोग्य आहे. आधुनिक, अधिक उत्पादन देणाऱ्या जाती रासायनिक खते आणि कीटकनाशकांशिवाय तग नाही धरू शकत. शिवाय वातावरणातील बदलाचा सामना करण्यासाठी सुद्धा काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले पारंपारिक बियाणेच सुयोग्य आहेत. हे वास्तव जनमाणसात रुजवून ‘सुरक्षित आहार आणि संतुलित पर्यावरण‘ चळवळ विकसित करण्याचा बीजोत्सव एक प्रयत्न आहे. त्यासाठी आज शुक्रवार पासून वनामती येथे तीन दिवसीय बीजोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बीजोत्सवात बियाण्याशिवाय सेंद्रिय शेतमालाची विक्रीसुद्धा होते. मात्र शेतकरी आणि ग्राहकांमध्ये नुसतीच देवाणघेवाण नको तर एकदुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होता आले पाहिजे, मानवीय नात्यांचा विकास व्हायला पाहिजे. कोणीही कोणाला लुबाडू, फसवू नये ही बीजोत्सव चळवळीची भावना आहे. बीजोत्सावात दिले जाणारे भोजन सेंद्रिय धान्य, भाजीपाला इ. वापरून तयार केलेले असावे असा प्रयत्न असतो. शिवाय बिनलागवडी भाज्या, भरड (मिलेट) धान्य, साखरेऐवजी गुळ आणि मोहफुले, पळसफुले इ. वनउपज वापरण्याचा प्रयत्न केला जातो.
हल्ली बिगरहंगामी भाज्यांचा वापर वाढला आहे. उदा. टमाटर, कोबी / फ्लॉवर इ. ( ही हिवाळ्यात येणारी पिके वर्षभर घेतल्या जातात) सेंद्रिय शेतीत सुद्धा पोलीहाउस वापरून , कृत्रिम वातावरण निर्मिती करून वर्षभर अशी पिके काही लोक घेत आहेत. अशा बिगर हंगामी भाज्या सेंद्रिय असल्या तरी योग्य नव्हेत. याबाबत ” स्वयंपाक : शोध आणि बोध ” ले. मालती कारवारकर या पुस्तकात विवेचन केले आहे. तसेच आहारगाथा – ले. डॉ. कमला सोहोनी, एका कडातून क्रांति – ले. मासानोबू फुकुओका, एक होता कारवर इ. बरीचशी विचारप्रवर्तक पुस्तके बीजोत्सवात विक्रीसाठी असतात. यातून वाचन संस्कृती विकसित होईल, विचारांची पेरणी होईल अशी आम्हाला आशा वाटते. शंभर वर्षानंतरसुद्धा कोणतेही उपकरण अथवा उर्जेशिवाय रानावनात सुद्धा पुस्तक नुसतं उघडलं की हे ज्ञान लगेच आपल्या सेवेत हजर होईल ही मुद्रित माध्यमांची शक्ती पुढच्या पिढ्यांना विशेष उपयोगी ठरेल यात आम्हाला शंका नाही. हल्लीच्या आंतरजालाच्या झंझावातात पुस्तकांना वाईट दिवस आलेले आहेत, म्हणूनच ग्रंथप्रेम वाढीस लागावे असा प्रयत्न बीजोत्सवात केल्या जातो.
खाली निर्देशित केलेल्या विचारांवर “बीजोत्सव समुहाचे” दिशादर्शनाचे तसेच प्रत्यक्ष काम चालते
मानवाचे आरोग्य मातीशी जुळलेले आहे – रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके आणि जीएम बियाणे यामुळे आज माती आणि पाणी सुद्धा प्रदूषित झाले आहे. शहरी ग्राहकांनी शेती/अन्नसाक्षर व्हावे; शेतांना प्रत्यक्ष भेटी देऊन आधुनिक शेतीचे भयावह रूप याची देही पाहावे. जीवनशैलीच्या आजारांना [मधुमेह, उच्च रक्तदाब, लकवा, कर्करोग, हृदयरोग आणि मुत्रपिंड (किडनी) अक्षमता] बळी पडल्यानंतर सुरक्षित आहाराचा शोध घेण्यापेक्षा आत्ताच जमेल तसा अंगणात, गॅलरीत, शेतात भाजीपाला तरी सेंद्रिय पिकवावा. काडीकचरा, पालापाचोळा, स्वयंपाकातील ओला कचरा (जैवभार) अनमोल आहे, तो जाळू नये, वाया घालवू नये, त्यापासून उत्तम खत तयार होते. अर्धवट कुजलेला काडीकचरा जमिनीतील उपयुक्त जीव-जीवाणूंचे भोजन आहे. त्यांच्याशिवाय शेती टिकू शकणार नाही या गोष्टींचा प्रचार, प्रात्यक्षिके बीजोत्सवातून केल्या जाते.
ग्राहक प्रबोधन – आजही बहुतांश ग्राहक बिनकिडीचा, देखणा, चकचकीत भाजीपाला पसंत करतात. असा शेतमाल वारंवार विषारी रसायनांची फवारणी करून कीडमुक्त ठेवल्या जातो, तो आरोग्यासाठी अधिक घातक ठरू शकतो. कृत्रिमरीत्या पिकविलेली केळी, आंबे सुद्धा असेच उपद्रवी असू शकतात. बिगरहंगामी भाजीपाला सुद्धा भरपूर रसायने वापरून पिकावितात. कोबी, मेथी, वाटाणा थंडीतील पिके आहेत. टमाटर उन्हाळ्यातील पिक नाही, त्याएवजी चिंच, कोकम, आमचूर वापरता येईल. हल्ली वर्षभर टमाटर वापरण्याची टूम निघाली आहे. हे अत्यंत घातक आहे. अनुभवी शेतकरी टमाटरला विषाचा गोळा म्हणतात, पिकविणारे स्वतः खात नाहीत. उन्हाळी काकडीचे सुद्धा असेच वास्तव आहे.
बदलते वातावरण – तापमानवाढ ही आजघडीला विश्वव्यापी समस्या आहे. अकाली पाउस , वादळवारे, गारपीट इ. अनुभव आपण वारंवार घेत आहोत. या समस्येचा सामना कसा करायचा? सर्वांना मिळून विचार करावा लागेल. या परिस्थितीत झाडे आपली मदत करू शकतील. बदलत्या वातावारणाचा वृक्षांवर कमीं परिणाम होतो. मोह, टेम्भरून, कवठ, कोकम, चिंच, आंबा, चारोळी, खजूर, ताड, सिंदी इ. अनेक झाडे आपल्या खाद्यान्न गरजा भागविण्यास हातभार लावतील.