नागपूर पोलिसांसाठी “फतेह” सिनेमाचे आयोजन, अभिनेता सोनू सूद यांची उपस्थिती

नागपूर : नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल हे त्यांच्या “सिंगल पॅटर्न” करिता प्रसिद्ध आहेत. पोलीस विभागात विविध उपक्रम राबवून शारीरिक व मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. याच “सिंगल पॅटर्न” उपक्रमांतर्गत, पोलीस आयुक्तांनी नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी प्रसिद्ध अभिनेते श्री सोनू सूद यांचा नुकताच प्रदर्शित झालेला “फतेह” हा चित्रपट दाखवण्याचे नियोजन केले.

सदर उपक्रम हा सर्व अधिकारी व अंमलदारांसाठी एक सुखद धक्का होता. या कार्यक्रमाची कोणालाही आधी कल्पना नव्हती. सध्या वाढत्या सायबर क्राईमविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. विशेषतः कर्ज ऍपच्या फसवणुकीतून फसवले जाणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन मिळावे आणि अशा फसवणुकीत फसल्याने आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, याची जाणीव करून देण्यासाठी फतेह चित्रपट महत्त्वाचा ठरतो.पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय फतेह सिनेमा बघताना

पोलीस आयुक्तांच्या विशेष प्रयत्नांमुळे व सोनू सूद यांच्या सहकार्याने अधिकारी व अंमलदारांसाठी “फतेह” चित्रपटाचे खास प्रदर्शन आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन दि.20 आणि दि. 21 जानेवारी 2025 रोजी ईटरनिटी मॉल, सीताबर्डी येथे झाले.

सदर उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदारांना पती-पत्नी असे निमंत्रित करण्यात आले होते. चित्रपट समाप्तीनंतर सर्वांना मोठे आश्चर्य वाटले, कारण सिनेमागृहात स्वतः सोनू सूद प्रत्यक्ष हजर झाले आणि त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. या प्रसंगी सोनू सूद यांनी प्रत्येक स्क्रीनवर जाऊन प्रेक्षकांशी हितगुज केले, फोटो काढले आणि कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमा दरम्यान, नागपूर शहर पोलीस दलातर्फे दि. 25/1/2025 रोजी स. 5.00 वाजता आयोजित टायगर रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मॅरेथॉनचे टी-शर्टचे अनावरणही सिनेनट सोनू सूद यांच्या हस्ते माननीय पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमास नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील, श्री. शेवाळे, पोलीस उपायुक्त श्री. निकेतन कदम, डॉ. अश्विनी पाटील, श्री. राहुल मदने, श्रीमती श्वेता खेडकर, तसेच सर्व पोलीस स्टेशनचे ठाणे प्रभारी व अधिकारी-अंमलदार उपस्थित होते. या अनोख्या उपक्रमा मुळे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्या सेवा काळात प्रथमच अशा प्रकारचा चित्रपट पाहण्याचा व सिनेनटाला प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव घेतला. सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. अचानकपणे या उपक्रमा मुळे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. नागपूर शहर पोलीस दलासाठी हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

या उपक्रमामुळे पोलीस दलातील ताणतणाव कमी होण्यास मदत झालीच, शिवाय सायबर क्राईमविषयी अधिक सजगता निर्माण झाली. पोलीस आयुक्तांच्या या सृजनशील उपक्रमाचे पोलीस दलात आणि नागपूर शहरात कौतुक करण्यात येत आहे. हा उपक्रम फक्त मनोरंजनापुरता सीमित न राहता पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलीस दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, फक्त कायद्याची अंमलबजावणी करणेच नव्हे, तर अधिकारी व अंमलदारांसाठी नवनवीन उपक्रम राबवणे हेही त्यांच्या जबाबदारीचा एक भाग आहे. हा कार्यक्रम अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक संस्मरणीय सोहळा ठरला.