मुंबई : हल्ली शालेय विद्यार्थ्यांसमोर जेवढे अभ्यासाचे ओझे नसेल, तेवढे दप्तराचे आहे, असे गंमतीने बोलले जाते. दरवर्षी हे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळा सुरू होण्याअगोदर सरकार, शाळा , पालक सगळ्यांमध्ये एकच चर्चा असते ती म्हणजे, विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन. वर्षानुवर्षे होणाऱ्या चर्चा या कागदोपत्रीच राहणाार असल्याचे दिसत आहे. कारण नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे. आता विद्यार्थ्यांना सात, आठ नाही तर तब्बल १५ विषयांचा अभ्यास करावा लागणाार आहे. विषय वाढल्याने शाळांची वेळ देखील वाढण्याची शक्यता आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर याबाबतची ब्लू प्रिंट देण्यात आली आहे.
दरम्यान, आतापर्यंत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सात ते आठ विषय होते. मात्र नव्या आरखड्यानुसार यामध्ये भर पडल्याचे समजते. व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण आणि आंतरविद्याशाखा विषय बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच तीन भाषा, विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेले तीन असे दहा विषय असणार आहे. याशिवाय स्काऊट, गाईड हे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल!
नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल केला आहे. हा बदल करताना भारतीय भाषांची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य विषयांचा ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, याबाबत विचार केला गेला आहे. आता यासंदर्भात शाळांकडून सूचना आल्यानंतर त्याचा अभ्यास करुन हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरूस्ती, सौंदर्य या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल तर दहावीला बागकाम, सुतारकाम, परिचर्या या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल. कलाशिक्षणात दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला या सर्वांची ओळख करून देण्यात येईल. या विषयाला श्रेणी देण्यात येईल. सादरीकरण, शिक्षकांचे निरिक्षण, विद्यार्थ्यांचे स्वयंमूल्यमापन, गट कामगिरी, कल्पकता याआधारे मूल्यमापन करण्यात येईल, असे समजते.
भाषांची सक्ती असणार!
दहावीमध्ये दोनऐवजी तीन भाषांची सक्ती असणार आहेत. त्यातील दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. तसेच अकरावी-बारावीत एक ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यातही एक भारतीय भाषा असणार आहे. तसेच नववी-दहावीत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी विषयांची संख्या वाढवली आहे. पाच ऐवजी दहा विषय शिकावे लागणार आहेत. त्यात तीन भाषा तर सात मुख्य विषय असणार आहेत. या विषयांमध्ये गणित, संगणक शास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण यांचा समावेश आहे.