लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार; निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ही योजना तूर्तास बंद, वाचा सविस्तर माहिती!

मुंबई : महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojna) योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २.४ कोटींहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. मात्र निवडणुकीच्या काळात यापुढे महिलांना पुढील हफ्ता मिळणार नाही. कारण लाडकी बहीण योजना अस्थायी रुपात निलंबित करण्यात आली असल्याचे समजते.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यानुसार, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच, राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आचार संहिता लागू असताना मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजनांना बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

योजनेचा निधी थांबवला!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत २ कोटी २० लाख महिलांनी लाभ घेतला होता. या महिलांच्या खात्यात आतापर्यंत ५ महिन्यांचे ७५०० रूपये जमा झाले आहेत. यानंतर आता महिलांना पुढच्या हप्त्याची म्हणजेच डिसेंबरमध्ये हाती येणार निधीची उत्सुकता लागली आहे. पण राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला असून, सध्या नवे अर्ज स्विकारणेही बंद केले आहे.

आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित!

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सरकारच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजनांची माहिती विचारली होती. त्यात महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेंतर्गत मोठा आर्थिक लाभ दिला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आयोगाने या विभागाकडून यासंबंधीची योग्य ती माहिती मागवली होती. त्यात विभागाने या योजनेला केला जाणारा निधीचा पतपुरवठा ४ दिवसांपूर्वीच थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याचा अर्थ निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याचे समजते. दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला आहे. तसेच नवे अर्ज स्विकारणेही बंद केले असून, लाडकी बहीण योजनेला तूर्त ब्रेक लागला आहे.

दिवाळी बोनसचे काय?

लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या तोंडावर खूश करण्यासाठी शिंदे सरकारने दिवाळी बोनसची घोषणा केली होती. याद्वारे ३००० रुपयांचा बोनस दिला जाणार होता. परंतू, निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर लाडक्या बहिणीला आता हा दिवाळी बोनस मिळणार नाही. तसेच डिसेंबरमध्ये दिवाळी बोनस मिळेल की नाही? याची काहीही शाश्वती नाही.