नवी दिल्ली : यंदा संपूर्ण देशभरात पावसाने थैमान घातले. पावसाची संततधार सुरु असल्याने महाराष्ट्र, आसाम, मिझोराम, केरळ आणि गुजरातसह इतर राज्यात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने केंद्रा कडे मदत मागितली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी (१ ऑक्टोबर) जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.
केंद्राकडून कोणत्या राज्यांना किती मदत?
केंद्राने महाराष्ट्रपाठोपाठ आंध्र प्रदेश: ₹१०३६ कोटी, आसाम: ₹७१६ कोटी, बिहार: ₹६५५.६० कोटी, गुजरात: ₹६०० कोटी, हिमाचल प्रदेश: ₹१८९.२० कोटी, केरळ: ₹१४५.६० कोटी, मणिपूर: ₹५० कोटी, मिझोराम: ₹ २१.६० कोटी, नागालँड: ₹१९.२० कोटी,सिक्कीम: ₹ २३.६० कोटी, तेलंगणा: ₹४१६.८० कोटी, त्रिपुरा: ₹ २५ कोटी आणि पश्चिम बंगाल: ₹४६८ कोटींची मदत देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंनी मानले आभार!
केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल १ हजार ४९२ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत, हे दाखवून दिले आहे, असे म्हणत शिंदेंनी केंद्र सरकारचे आभारही मानले.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई!
जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये खरिपातील पिकांचे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने १३८ कोटी ५५ लाख ४८ हजार रूपयांचे वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर आणि दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे.