विटा : लाडकी बहीण’नंतर आता ‘मुख्यमंत्री सुरक्षित बहीण’ योजना सुरू होत आहे. महिलांवरील अत्याचार सरकार सहन करणार नाही, कडक शासन केले जाईल. अत्याचार करणार्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
दरम्यान, टेंभू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुदळ मारून झाले. त्यानंतर विटा येथे शेतकरी मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, अमोल बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, सुहास शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
लाडक्या बहिणींनी सावत्र भावापासून सावध राहावे!
सर्वसामान्य जनतेसाठी सर्वाधिक योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे; परंतु काहीजण चांगल्या कामात अडथळे आणण्याचे काम करीत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनी सावत्र भावापासून सावध राहावे. ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात जाणाऱ्यांना आता कोल्हापुरी जोडा दाखविण्याची वेळ आली आहे. महायुती सरकारला ताकद द्या. हेच दीड हजार, पुढे दोन अडीच व तीन हजार दरमहा करण्याचा शब्द देतो, असे एकनाथ शिंदे ठणकावून म्हणाले.
गड आला पण सिंह गेला…
माजी आमदार अनिल बाबर यांचे नाव घेतल्याशिवाय या सभेला सुरुवात होऊ शकत नाही. अनिल बाबर यांच्याशिवाय टेंभू योजनेचे भूमिपूजन करावे लागेल असे वाटले नव्हते. अनिल बाबर यांचे टेंभू योजनेतील योगदान कोणालाही विसरता येणार नाही. टेंभू योजना पूर्णत्वाला जात आहे, पण आज अनिलभाऊ हयात नाहीत. गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती झाली आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकर्यांना फायदा होणार आहे. सांगली जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ योजनांना भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे त्या क्षेत्रातील जमीन ओलिताखाली येऊन शेतकर्यांना दिलासा मिळत आहे, असेदेखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
महायुतीने राज्याचा विकास केला!
पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, टेंभू उपसा सिंचन योजनेत माजी आमदार अनिल बाबर यांचे योगदान मोठे आहे. महायुतीने या भागाचा तसेच राज्याचा विकास केला आहे. महायुतीची सत्ता आली तरच सुरू असलेल्या योजना पूर्ण होतील. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीच्या पाठीशी राहावे. तानाजी पाटील म्हणाले, टेंभू योजना पूर्ण करण्याचा ध्यास अनिलभाऊ यांनी घेतला होता. सहाव्या टप्प्यास मंजुरी मिळाली. आज कामाचे भूमिपूजनही झाले आणि खर्या अर्थाने अनिलभाऊ यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सहाव्या टप्प्यासाठी एकरकमी निधी मंजूर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत.
सुहास बाबर यांना ताकद देणार!
सुहास बाबर यांना ताकद देणार, अनिलभाऊंची अपूर्ण काही स्वप्ने असतील ती आता सुहास बाबर यांनी पूर्ण करावीत. तुमच्या सर्वांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. अनिलभाऊंची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक रुपयाही कमी पडणार नाही. सुहास बाबर यांना पूर्ण ताकद देऊ, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.