Mumbai Alert: मुंबईत हायअलर्ट; मोठ्या दहशतवादी हल्ल्याची भीती, पोलिसांकडून ‘मॉक ड्रिल’!

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या (Terrirst Attack) निशाण्यावर असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मुंबई पोलिसांना (Mumbai Police alert) दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आलेय.

दरम्यान, प्रत्येक धार्मिक स्थळावर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे. मुंबईमध्ये पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैणात करण्यात आला असून शहरातील प्रत्येक बारीक हालचालीवरती पोलीस लक्ष ठेवून आहेत.

सेंट्रल एजन्सीने सांगितलेली माहीत काय?

दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका आहे, अशी माहिती सेंट्रल एजन्सी यांच्याकडून मुंबई पोलिसांना मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत आणि मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीची ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर ‘मॉक ड्रिल्स’ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील सर्व डीसीपींना त्यांच्या-त्यांच्या झोनमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ‘मॉक ड्रिल’

संभाव्य दहशतवादी धोक्यांबाबत केंद्रीय यंत्रणांनी दिलेल्या सतर्कतेनंतर मुंबई पोलिसांनी मुंबई शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. या अलर्टनंतर धार्मिक स्थळे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर ‘मॉक ड्रिल’ आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त!

पुढील काही दिवसांवर नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. त्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात गरबा आयोजित केला जातो, हजारोंच्या संख्येने लोक जमतात. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेवर भर दिला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. नवरात्री, दिवाळी यासारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईवर याआधी झालेले दहशतवादी हल्ले पाहता पोलिसांनी गुप्तचर यंत्रणाकडून मिळालेल्या माहितीनंतर खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.