मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात गणोशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी होताना दिसत आहे. मुंबईतील ‘लालबागच्या राजा’ च्या दर्शनासाठी तर भाविकांनी तुडूंब गर्दी केली आहे. अशातच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्रीला धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीने हा व्हिडीओ स्वत: सोशल मीडियावर शेअर करत याबाबत संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘पांड्या स्टोअर’ मालिकेत काम करणारी अभिनेत्री सिमरन बुधरुपसोबत हा प्रकार घडला आहे. सिमरन गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मंडपात पोहोचली होती. सिमरन एकटीच नव्हती तर तिची आईही गणपतीच्या दर्शनासाठी तिच्यासोबत आली होती, परंतु यावेळी तिच्यासोबत असे काही घडले की, ज्यानंतर ती चर्चेत आली आहे.
आईचा फोन हिसकावला!
सिमरनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून लालबागच्या राजाच्या मंडपातील बाऊन्सर्सने तिच्याशी आणि तिच्या आईशी गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केलेला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सिमरनने संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला आहे. ती म्हणाली, “मी आणि माझी आई दर्शनासाठी लालबागच्या राजाला गेलो होतो, परंतु तेथील कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीमुळे आम्हाला वाईट अनुभव आला. फोटो काढत असताना संस्थेतील एका व्यक्तीने माझ्या आईचा फोन हिसकावून घेतला. ती माझ्या मागे रांगेत उभी होती. तिने फोटो काढण्यासाठी जास्त वेळही घेतला नाही. कारण दर्शनाची माझी पाळी आली होती. जेव्हा आईने फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा फोन हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला” असे सिमरनने सांगितले.
बाऊंसरला अभिनेत्री असल्याचे कळताच घेतली माघार!
पुढे सिमरन म्हणाली, “मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण बाऊन्सर्सनी माझ्याशी गैरवर्तन केले. जेव्हा मी त्यांचे वर्तन रेकॉर्ड करू लागले तेव्हा त्यांनी माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि मी ओरडत होते ‘हे करू नका’ तुम्ही हे काय करत आहात? जेव्हा त्यांना कळले की मी अभिनेत्री आहे, तेव्हा त्यांनी माघार घेतली.
दर्शन घेताना होतोय भाविकांना त्रास!
तसेच, सिमरने पोस्टमध्ये म्हटले की, ही संपूर्ण घटना जागरूकता आणि जबाबदारीची गरज अधोरेखित करते. सकारात्मकता आणि देवाच्या आशीर्वादाच्या शोधात लोक अशा ठिकाणी चांगल्या मनाने भेट देतात. त्याऐवजी आम्हाला अरेरावी आणि गैरवर्तनाला सामोरे जावे लागते. गर्दी हाताळणे हे एक आव्हानात्मक काम आहे, परंतु अशा प्रकारे भाविकांसोबत गैरवर्तन न करता सुव्यवस्था राखणे ही तेथील लोकांची जबाबदारी असल्याचे ती म्हणली आहे.