काळजी घ्या! भारतात सुद्धा मंकीपॉक्सचा संसर्ग; आरोग्य मंत्रालयाची माहिती काय?

आधी कोरोना (Corona) आणि आता मंकीपॉक्स. जगातील काही देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. ज्यामुळे जगभरातील आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढत आहे. अशातच आता नुकताच परदेशातून भारतात परतलेल्या एका तरुणाला मंकीपॉक्सचा (Mpox) संसर्ग झाल्याचा संशय आहे.

दरम्यान, रुग्णाला विलगीकरणासाठी विशेष रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. MPox च्या उपस्थितीची पुष्टी करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्याची चाचणी केली जात आहे.

संशयित तरूणाची प्रकृती स्थिर!

संशयित तरूणाची प्रकृती सध्या स्थिर असून, मंकीपॉक्स (Mpox) विषाणूच्या उपस्थितीची पुष्टी करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी केली जात असल्‍याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्‍या हवाल्‍याने दिली आहे. हे प्रकरण प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार व्यवस्थापित केले जात आहे. देशातील प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी संपर्क ट्रेसिंग चालू आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

आतापर्यंत ९९,१७६ मंकीपॉक्सची प्रकरणे!

जागतिक आरोग्य संघटनानुसार (WHO) १ जानेवारी २०२२ ते ३० जून २०२४ या कालावधीत जगभरात मंकीपॉक्सची एकूण ९९,१७६ प्रयोगशाळा-पुष्टी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जून २०२४ मध्ये एकूण ९३४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशातील पाच सदस्य देशांपैकी, थायलंडमध्ये ८०५ पुष्टी प्रकरणे आणि १० जणांचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला. त्यानंतर इंडोनेशियामध्ये ८८ पुष्टी प्रकरणे, तर श्रीलंकाध्ये ४ आणि नेपाळमध्ये १ मृत्यू झाला आहे.

मंकीपॉक्सची ही लक्षणे आहेत!

– मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि सुजलेल्या लिम्फ नोड्स यांचा समावेश होतो. यानंतर पुरळ उठतात. पुरळ उठायला चेहऱ्यापासून सुरू होतात आणि संपूर्ण शरीरात उठतात. डागांपासून मुरुमांपर्यंत पुरळ विकसित होते, जे शेवटी खरुज बनतात. ही लक्षणे सहसा दोन ते चार आठवडे राहतात.

– हा आजार संसर्गजन्य असून पूर्वीच्या देवी अजारासारखा आहे. आफ्रिकन देशांव्यतिरिक्त इतर देशांत रुग्ण नसले तरी आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांकडून हा आजार पसरण्याची भीती आहे. हा आजार खोकल्यातूनही पसरू शकतो. तसेच लोकांनी काळजी घेतली पाहिजे.

– मंकीपॉक्सबाबत कोणतेही प्रकरण देशात आले नाही. याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना केंद्र सरकाराकडून लागू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी केले.