नागपूर : राज्य सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येत आहे. सध्या लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना, वयोश्री योजनेतून दरमहा थेट खात्यात पैसे जमा होत आहे. आता तुम्ही म्हणाल, लाडकी मशीन योजना सरकारने कधी जाहीर केली. काय आहे ही योजना… तर सरकारने ही योजना जाहीर केली नाही तर एका तांत्रिक चुकीमुळे संपूर्ण प्रकरण घडले आहे. वाचा हे संपूर्ण प्रकरण.
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे Axis Bank ATM आहे. एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला. त्याने १ हजार रूपयाची रक्कम काढायची कमांड दिली. मात्र त्याला सहाशे रूपये जास्तीचे म्हणजेच एकुण १६०० रूपये रोख रक्कम एटीएममधून मिळाली. एक्सिस बँक एटीएममधून अधिकचे पैसे मिळत असल्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे एटीएममध्ये रांगच लागली.
३ लाख रूपयांचा फटका
दरम्यान, एका जागरूक नागरिकाने पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यांनी तात्काळ एटीएम बंद केले. दरम्यान एका व्यक्तीला हजार रुपये काढल्यावर सोळाशे रुपये मिळत असल्याचे लक्षात आल्यावर कित्येक लोकांनी एकापेक्षा जास्त एटीएम कार्ड घेऊन या एटीएमवर गर्दी केली होती. मात्र तोपर्यंत सुमारे तीन लाखांचा फटका बसला असल्याचे बँकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
नेमके प्रकरण काय?
अनेक एटीएमवर विविध प्रकारच्या तांत्रिक चूका घडल्याचे प्रकार होत असतात. खापरखेडा येथील घटनाही तांत्रिक चूक झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. मात्र दुपारी एटीएम (ATM) बंद करत दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता एटीएम सुरूही करण्यात आले.