दहीहंडी साजरी करताना तब्बल १०६ गोविंदा जखमी; लहान मुलांचाही समावेश!

मुंबई : काल (२७ ऑगस्ट) मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यात आला आहे. अशातच यंदा ही मुंबईसह ठाणे परिसरात दहीहंडीचा जल्लोष सर्वाधिक पाहायला मिळाला. याठिकाणी वेगवेगळ्या राजकीय मंडळींनी दहीहंडीचे आयोजन केले होते. येथे लाखो रुपयांचे बक्षिस दहीहंडीला देण्यात आले, मात्र दहिहंडी साजरी करताना उभारलेले मानवी मनोरे कोसळून काल १०६ गोविंदा जखमी झाले, असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, सर्व गोविंदांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ७४ गोविंदांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. तसेच, जखमींमध्ये लहान मुलांची संख्या ही लक्षणीय आहे.

मुंबईमध्ये गोविंदांना झालेली दुखापत!

डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या के.इ.एम. मध्ये सहा गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यामध्ये २५ वर्षीय गोविंदाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती, के.इ.एम. अधिष्ठाता डॉ. मोहन देसाई यांनी दिली. तसेच, १३ वर्षांच्या आर्या गंगावणे हिच्या मांडीचे हाड मोडल्यामुळे तिला नायर रुग्णालयात दाखल केल्याची माहिती डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली. यासोबतच, राजावाडी रुग्णालयात तीन लहान मुलांना दाखल करून घेण्यात आले आहे.

ठाणेमध्ये गोविंदांना झालेली दुखापत!

ठाण्यात १४ गोविंदा जखमी झाले असल्याचे समजते. यात जिग्नेश तांबले (२६) याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून ऋषिकेश धायबर (२१) याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासोबतच, उर्वरित सहा जणांना देखील किरकोळ दुखापत झाली, असल्याची माहिती मिळाली आहे.

रात्री उशिरापर्यंत दहीहंडी उत्सव!

अगदी रात्री उशिरापर्यंत दहिहंडी उत्सवासाठी सराव करणारे गोविंदांना वर्षातून एकदा येणार्‍या दहिहंडी उत्सवाची खूपच प्रतीक्षा लागून राहिलेली असते. मंगळवारी सकाळपासूनच लहान–मोठ्या गोविंदांनी झोपडपट्टीत, मैदाने, रस्ते, चौक आदी ठिकाणी दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी केली होती. तसेच, संधी मिळेल त्या ठिकाणी सार्वजनिक दहिहंडी उत्सवाच्या ठिकाणी गोविंदा पाच, सहा, सात ,आठ थर उभारून दहिहंडी फोडत होते. त्यातून त्यांच्या मंडळाला दिवसभरात चांगली घसघशीत कमाई देखील झाली.