शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले यावरून कोणीही राजकारण करू नये…

मुंबई : नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते वर्षभरापूर्वीच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पण सोमवार (ता. 26 ऑगस्ट) रोजी हा पुतळा कोसळल्याची धक्कादायक घटना घडली, आता या प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनीही याबाबत भाष्य केले आहे.

दरम्यान, या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जावरुन महायुती सरकार कोंडीत सापडले होते. राज्य सरकारने हा पुतळा नौदलाने उभारल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी महाविकास आघाडीने या मुद्द्यावरुन महायुती सरकारला धारेवर धरले आहे, परंतु आता मात्र या प्रकरणावरून फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. यावर कोणीही राजकारण करु नये. पुतळा उभारताना राजकोट किल्ल्यावरील वाऱ्यांचे आकलन शिल्पकाराला करता आले नाही. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याचठिकाणी नवा पुतळा उभारू. मात्र या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले आहेत, परंतु मला असे वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली. तसेच, अफझलखानासारख्या कितीही प्रवृत्ती चालून आल्या तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा कोथळा बाहेर काढू, असेही ते म्हणाले.

राजकोट किल्ल्यावर प्रशासनाकडून पंचनामा!

पुतळा कोसळल्यानंतर तिथे आज सकाळी पंचनामा देखील सुरू करण्यात आला. तसेच, पोलिस यंत्रणा आणि फॉरेन्सिक एक्सपोर्टच्या माध्यमातून हा पंचनामा करण्यात आला आहे. साधारण दीड तासाने नौदलाचे दोन अधिकारी याठिकाणावरुन पाहणी करुन बाहेर पडले. त्यानंतरही सिंधुदुर्गातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधील तज्ञांकडून पंचनामा सुरू होता. आत गेलेल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून स्मारकाच्या ठिकाणचे मोजमाप आणि इतर बाबींची नोंद घेतली असल्याचे समजते.