यवतमाळ : यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला. महिला पोलीस कर्मचारी आणि कार्यक्रमाला आलेल्या काही महिलांमध्ये बाचाबाची झाल्याचेही समोर आले. आपल्याला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालेला नाही, काही तांत्रिक अडचणीमुळे यात अडथळा येत आहे. या तक्रारी महिलांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, असे समजते.
दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते, आणि या घटनेचा व्हिडिओ देखील (Video Viral) आता समोर आलेला आहे.
कोण होत्या त्या महिला?
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ घालणाऱ्या या महिला यवतमाळमधल्या दिग्रस पारधी बेड्यावरच्या होत्या. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील या महिला असल्याचे समजते. महिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यावर संजय राठोड आणि आमदार भावना गवळी गोंधळ घालणाऱ्या महिलांकडे पोहोचले आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पोलिसांनी अन्याय केल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला. दरम्यान, कुणी कितीही मोठा पोलीस असला आणि जर त्याने अन्याय केला असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई करु, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून दिले आहे.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
‘आधी सरकारी काम आणि ६ महिने थांब’ असा प्रकार होता. त्यामुळे लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे. परंतु आज महायुती सरकारने लोकांना जे हवे ते दिले आहे. १ कोटी ७ लाख बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले, त्यामुळे तुमचे अभिनंदन करतो, असे शिंदे म्हणाले. तसेच विरोधक ही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र ही योजना कायम स्वरुपी चालू राहणार, कारण हे देणारे सरकार आहे घेणारे नाही. आता ३ सिलेंडर मोफत देण्याचा निर्णयही घेतला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.