आपली हाडे हा आपल्या भक्कम शरीराचा पाया असतो. शरीराच्या जडणघडणीपासून ते चालणे, उठणे, बसणे, फिरणे अशा प्रत्येक गोष्टीत त्यांची गरज असते. मात्र पोषणाचा अभाव आणि बैठी जीवनशैली त्यांना अशक्त बनवते. त्यामुळे हाडांना मजबूत करण्यासाठी, फळे खाणे आवश्यक आहे, जे हाडांच्या आजारांपासून संरक्षण करतात. हाडांमध्ये वेदना, वाकडी हाडे, फ्रॅक्चरचा धोका, संसर्ग, पाठदुखी, सांधेदुखी यापासून वाचायचे असेल तर हाडे मजबूत करणारे फळ खा. चला तर जाणून घेऊया याकरिता कोणती फळे खाल्ली पाहिजेत, ज्यांच्यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आढळते.
संत्रे (Orange)
संत्रे या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. संत्री खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामधील फायबरमुळे ते पचनासाठी देखील चांगले असते. वयाच्या ३० व्या वर्षानंतर आहारात संत्र्याचा समावेश नक्की करा.
अननस (Pineapple)
अननसमध्ये देखील मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अननस खाल्ल्याने अनेक आजारांपासून तुमची सुटका होते.
द्राक्ष (Grapes)
द्राक्षामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. जर तुम्हाला हाडांचे दुखणे असेल किंवा हाडांमधून कट-कट असा आवाज येत असेल तर द्राक्षांचे सेवन नक्की करा. द्राक्षे हृदय, डोळे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.
किवी (Kiwi)
अलिकडे डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. डेंग्यू रोगावर किवी हे अतिशय प्रभावी फळ आहे. किवी हा कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहे. किवी रोग प्रतिकारशक्ती आणि प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. किवी नखे, दात, केस आणि त्वचा देखील निरोगी ठेवण्यास मदत करते.
पपनस (Pomelo)
पपनस दिसायला अगदी संत्र्यासारखेच असते. हे लिंबूवर्गीय फळ आहे. पपनस हे फळ फायबर आणि व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. हे फळ शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करते. हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे.
केळ (Banana)
ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे. त्यांनी रोज केळीचे सेवन करावे. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले पोषक तत्व हाडे आणि दातांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच केळीमुळे ऊर्जा वाढण्यासही मदत मिळते.
टीप : वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.