महाविकास आघाडी कडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक; प्रमुख नेत्यांची चर्चा काय?

मुंबई : बदलापूर (badlapur) पूर्वेकडील आदर्श शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेविरोधात संतप्त पालक आणि बदलापूरवासीयांनी मंगळवारी हजारोंच्या संख्येने शाळेबाहेर एकच गर्दी केली होती. सकाळपासूनच पालक (parents) आणि नागरिकांनी शाळेबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या, अशातच आता या प्रकरणी महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

दरम्यान, बदलापूर येथील शाळेत २ चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झालेली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बैठक रद्द करुन त्या ऐवजी, राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक!

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील महिला सुरक्षा प्रश्नावर दीर्घ चर्चा झाली. गेल्या १० वर्षात महिला असुरक्षिततेचे वाढते प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावर सरकारच्या भूमिका संवेदनशील नसल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आता येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

बदलापूरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न केले, हे या प्रकरणी निदर्शनास येत आहे. घटना घडली ती संस्था आरएसएस व भाजपशी संबंधित आहे. त्यामुळे या दोन्ही संघटनांची बदनामी टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला. त्याचा उद्रेक कालच्या घटनेतून झाला, असा दावा नाना पटोले यांनी केलेला आहे.