सोशल मीडियावर सध्या एखादी गोष्ट व्हायरल झाली की ती इतकी वणव्यासारखी पसरते की लोक ती खरी आहे की नाही याची शहानिशा न करता ती खरी मानतात. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हे बरेचदा घडतं. पण बरेचदा कलाकारांना या गोष्टीचा वैयक्तिक त्रासही होतो. सध्या असाच प्रकार अभिनेता श्रेयस तळपदेच्या बाबतीत घडला आहे. सोशल मीडियावर त्याच्या निधनाची पोस्ट व्हायरल झाली आणि या व्हायरल पोस्टमुळे त्याच्या चाहत्यासह इतर सर्वांनाच धक्का बसला होता.
दरम्यान, आता मी जिवंत असून पूर्णपणे निरोगी आहे, असे स्वतः त्यानेच सांगितले आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर एक लांबलचक नोट लिहून त्याने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.
पोस्टमधे नेमकं काय म्हणाला श्रेयस?
“प्रिय मित्रांनो, मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. माझ्या निधनाचा दावा करणारी एक व्हायरल पोस्ट मला कळली आहे. मला समजले आहे की हसण्याला त्याचे स्थान आहे, परंतु जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो, तेव्हा ते खरे नुकसान करू शकते. विनोद म्हणून जे सुरू झाले असेल ते आता अनावश्यक चिंता निर्माण करत आहे आणि माझी काळजी घेणाऱ्या लोकांच्या भावनांशी खेळत आहे, विशेषत: माझ्या कुटुंबाशी. माझी धाकटी मुलगी, जी दररोज शाळेत जाते, तिच्या आरोग्याबद्दल मी आधीच काळजीत आहे. या बातमीने तिची भीती आणखी वाढवली आहे, तिला तिच्या मित्र आणि शिक्षकांकडून आणखी प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. माझ्या निधनाबद्दल चुकीची माहिती पसरवणे आत्ताच थांबवा अशी माझी विनंती. कारण या सर्व खोट्या बातमीचा परिणाम माझ्या कुटुंबावर होत आहे. तसेच, माझ्या प्रकृतीची चौकशी करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार तुमची काळजी आणि प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असेही श्रेयस म्हणाला.
नेमके प्रकरण काय?
काही महिन्यांपूर्वी श्रेयस तळपदे मृत्यूच्या दारातून परत आला होता; परंतु आता तो पूर्णपणे बरा आहे. मात्र आता अशातच कुणीतरी सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूची बातमी टाकली आणि यामुळे श्रेयसच्या चाहत्यांना धक्काच बसला. आता श्रेयसने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट करताच चाहत्यांना आनंद झाला असून श्रेयसने खोटी बातमी टाकणाऱ्याला चांगलेच उत्तर दिले आहे.
श्रेयस तळपदे लवकरच दिसणार या चित्रपटात!
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर श्रेयस तळपदे सध्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात श्रेयस एका खास भूमिकेत दिसणार आहे.