३ दिवसांतच ‘स्त्री २’ ठरला ब्लॉकबस्टर सिनेमा; या चित्रपटांचेही तोडले रेकॉर्ड!

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘स्त्री २’ अखेर १५ ऑगस्टला रिलीज झाला आहे. प्रेक्षक या हॉरर-कॉमेडी सिक्वलची आतुरतेने वाट पाहत होते. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी स्त्री २ ला तुफान प्रतिसाद दिला. इतर दक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांचे आव्हान असूनही ‘स्त्री २’ ने प्रेक्षकांना आपल्याकडे वळवले आहे. तसेच, अवघ्या ३ दिवसांतच हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला असून या सिनेमाचे बजेट २ दिवसांतच वसूल झाले.

दरम्यान, पहिल्याच दिवशी सिनेमाने ५१.८ कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली होती आणि आता तिसऱ्या दिवशी ४४ कोटी रुपयांची कमाई करत या सिनेमाने सर्वांना थक्क केले आहे.

‘स्त्री २’ चे जगभरातील कलेक्शन

चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर ‘स्त्री २’ ने ३ दिवसात १५० कोटींचा आकडा पार केला आहे. मात्र, अधिकृत आकडे अद्याप आलेले नाहीत. चित्रपटाचे यश पाहून अनेक बॉलिवूड स्टार्स आणि चित्रपट निर्मात्यांनी दिग्दर्शक अमर कौशिक यांचे कौतुक केले आहे.

‘स्त्री २’ ने तोडले रेकॉर्ड!

१५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपैकी ‘स्त्री २’ ने ओपनिंग मध्येच रेकॉर्ड तोडले. स्त्री२ ने ‘गदर २’ (४०.१० कोटी), ‘एक था टायगर’ (३२.९३ कोटी), ‘सिंघम रिटर्न्स (३२.१० कोटी), ‘मिशन मंगल’ (२९.१६ कोटी) आणि ‘टायगर ३’ (४४.५ कोटी) यांना मागे टाकले आहे.

‘स्त्री २’ मधील प्रमुख भूमिका!

‘स्त्री २’ मध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव बरोबरच पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, विजय राज आणि तमन्ना भाटिया यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहेत.