पुणे : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ आज पुण्यात होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी याठिकाणी शुभारंभ होणार आहे.
कार्यक्रमासाठी १५ हजार महिला राहणार उपस्थित!
राज्यातील १५ हजाराहून अधिक लाभार्थी महिला आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, महिलांसाठी बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे या सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात आली असल्याचे समजते.
आतापर्यंत ८० लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा!
१४ ऑगस्टपासूनच योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत राज्यात ८० लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम, म्हणजेच ३ हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांच्या बँक खात्यात सुध्दा १७ ऑगस्टपर्यंत योजनेचा निधी जमा होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील ५ लाख महिलांच्या खात्यावर रक्कम जमा!
या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली असून पुणे जिल्ह्यातील ५ लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे.