कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांनी आज संप पुकारला असून राज्यातील देखील डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत. दरम्यान, निवासी डॉक्टरांचे ‘काम बंद’ आंदोलन आज सकाळी नऊपासून सुरू होणार आहे.
कोलकाता येथे आरजी कार मेडिकल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून या निषेधार्थ संप पुकारण्यात आला आहे यामध्ये तब्बल ८ हजार डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत. मात्र या काळात तातडीच्या सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ओपीडी सेवा, नियोजित शस्त्रक्रिया, वॉर्ड ड्युटी, लॅब सेवा आणि शैक्षणिक कामे बंद राहणार आहेत. सोमवारी जे.जे. रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी कँडल मार्च काढून या घटनेचा निषेध केला असून यामध्ये प्रशासनाने तत्काळ कारवाई करून सर्व मागण्यांवर तोडगा काढावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सेंट्रल मार्ड-महाराष्ट्र निवासी डॉक्टरांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून सर्व स्थानिक मार्ड संस्थांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात आंदोलन!
पुण्यात ५६६ निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनामुळे ससूनच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना फटका बसण्याची शक्यता आहे. आपत्कालीन विभाग वगळता इतर विभागात काम न करण्याचा डॉक्टरांनी इशारा दिला आहे.
नागपुरातही शासकीय मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे डॉक्टर आजपासून संपावर उतरले आहेत. त्यामुळे मेडिकलमधील रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
मुंबईमधील बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित कूपर, केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज सकाळपासून, संपावर आहेत. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या रहिवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांनी हा संप पुकारला आहे.