विनेश फोगाटला दिले जाईल सिल्व्हर मेडल; हरियाणा सरकारची घोषणा!

हरियाणा : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यावरून देशभरात चर्चेचे वातावरण आहे. दरम्यान, अशातच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी (Nayab Singh saini) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विनेश फोगाटला सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान आणि सुविधा मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.

महिला पैलवान विनेश फोगाट हीने ६ ऑगस्ट रोजी ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारुन रौप्य पदक निश्चित केले होते. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी तिचा सुवर्ण पदकासाठीचा सामना होणार होता; परंतु त्याआधीच विनेशचे वजन १०० ग्राम जास्त असल्याचे निदर्शनात आले आणि त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले. तसेच, तिला रौप्य पदक मिळणार नसून अंतिम फेरीसाठीही अपात्र करण्यात आले.

हरियाणा सरकारकडून सिल्व्हर मेडल दिले जाईल!

हरियाणाची शूर कन्या विनेश फोगाट हिने जबरदस्त कामगिरी करून ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र काही कारणांमुळे ती ऑलिम्पिकची फायनल खेळू शकली नाही, पण ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. म्हणूनच आता सरकारने ठरवले आहे की, विनेश फोगाटचे स्वागत आणि अभिनंदन हे एका मेडलिस्टसारखंच केले जाणार असून, तिला सिल्वर मेडल, बक्षीस आणि अन्य सुविधा हे सर्व दिल्या जाईल, असे मुख्यमंत्री नायब सिंह यांनी ट्विट करत जाहीर केले आहे.

विनेशला अपात्र घोषित केल्यानंतर देशात निराशा!

विनेश फोगाट ही ऑलिम्पिक कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. या विजयासह विनेशने भारताचे पदक निश्चित केले होते. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी विनेशसाठी एक वाईट बातमी आली. विनेश फोगाट हिला १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले आणि या बातमीने देशभरातील क्रीडाप्रेमींच्या डोळ्यात पाणी आले.