फिट राहण्यासाठी झोपेपूर्वी काय खावे? काय टाळावे? जाणून घ्या!

आजकाल प्रत्येकाची पुरेशी झोप होत नसते आणि त्याकरिता झोप पूर्ण होण्यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत असतात. जर तुम्हाला कुठलेही झोपेचे विकार नसतील तर तुम्हाला झोपेसाठी आणखीन आव्हानांची गरज नाही. चांगल्या झोपेसाठी निरोगी पोषण आणि रात्रीचे जेवण कसे असावे? हे देखील जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे असते. पावसाळ्यात फिट राहण्यासाठी तुमच्या रात्रीच्या नित्यक्रमातून कोणत्या प्रकारचे पदार्थ काढून टाकले पाहिजेत? किंवा कोणते पदार्थ रात्री खाल्ल्याने त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो? याची सविस्तर माहिती मुंबईतील आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे.

यामध्ये त्यांनी सांगितले :

काय टाळावे?

सर्वसाधारणपणे तुम्हाला पचायला कठीण असलेले पदार्थ, जास्त साखर किंवा मसाले असलेले पदार्थ आणि छातीत जळजळ वाढवणारे पदार्थ यांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आहारात कॅफेन असलेले पदार्थ म्हणजेच मद्य, कोल्ड्रिंक, कॉफी, चहा इत्यादी पदार्थ टाळणे अत्यावश्यक आहे. कॅफेन किंवा बाहेरील जंक फूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील झोप येणाऱ्या हार्मोन्सवर त्यांचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. या पदार्थांच्या सेवन केल्यामुळे दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, ऍसिडिटी आणि अशक्तपणा जाणवतो.

तसेच, झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यास सुरुवातीला झोप लागेल: मात्र त्याचा झोपण्याच्या हार्मोन्स वर परिणाम झाला असल्याकारणाने सतत जाग येत असते. त्याचप्रमाणे लघवी सतत येत असते. त्यामुळे डिहायड्रेशनचा शरीराला त्रास होतो. परिणामी आपले तोंड कोरडे पडते आणि सतत तहान लागते म्हणून शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी मद्यपान, कॅफेन आणि जंक फूड टाळणे आवश्यक आहे. पदार्थात साखरेचे जे पदार्थ असतात त्यामुळे शरीरातील ग्लुकोजच्या लेवलमध्ये वाढ होते. शरीरात ग्लुकोज लेवल वाढल्याने आपली एनर्जी जास्त असते आणि परिणामी आपल्याला झोप लागत नाही. त्यामुळे शक्यतो साखरेचे पदार्थ झोपण्यापूर्वी टाळणे आवश्यक आहे.

झोपण्यापूर्वी काय खावे?

झोपण्यापूर्वी सहसा गरम दूध प्यावे. जेणेकरून शांत झोप लागते त्याचबरोबर दुधात इलायची आणि जायफळ घालून पिले तर हे उपाय चांगल्या झोपेसाठी उत्तम ठरते. झोपण्यापूर्वी दुधात बदाम, हळद, केसर असे पदार्थ खाल्ल्याने झोप येण्यास मदत होते आणि चांगली झोप झाली असल्यामुळे शरीर देखील निरोगी राहण्यास उपयुक्त ठरते, अशी माहिती आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे.