सिंधुदुर्गाला रेड अलर्ट तर, विदर्भाला यलो अलर्ट
मुंबई(Mumbai), 9 जून :- राज्यात ठीकठिकाणी पावसाला दमदार सुरुवात झाली. मुंबईतील दहिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात पाऊस सुरू आहे. तर, कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुणे, विदर्भातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यात पाऊस जोरदार बॅटिंग करत आहेत. पुण्यात पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गाला आज रेड अलर्ट तर, संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात पावसाचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईत वरुणराजाचे आगमन
आज पहाटेपासून मुंबईत ठीकठिकाणी वरुणराजाचे आगमन झाले आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, कुर्ला, घाटकोपर, कुलाबा, दादर, अंधेरी, वांद्र्यात पावसाने हजेरी लावली. पुढील 3-4 तास मुंबईत पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. तर, तशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट तर, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट तर, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच सरासरी ५०-६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
कल्याण-डोंबिवलीत पाऊस बरसला
आज पहाटे तासभर कल्याण-डोंबिवलीत पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस झाला नसला तरी रिमझिम पावासामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे.
पावसामुळे लोकलवर परिणाम
रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे लोकलवर परिणाम झाला. मध्य रेल्वेवरील लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे. अंबरनाथ दरम्यान सिग्नल बिघाड झाला होता. सिग्नलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड मध्य रेल्वेकडून दुरुस्त करण्यात आला आहे.
वसई विरारमध्ये पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी
वसई विरारमध्ये पहिल्याच पावसात सखल भागातील रस्त्यावर पाणी साचल होते. वसईच्या साईनगर, विश्वकर्मा नगर, समता नगर, दिवानमान, माणिकपूर रोड येथे पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचले आहे. या भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी आभाळ भरलेले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
सांगलीत पावसामुळे अग्रणी नदीला पूर
सांगली जिल्ह्यात पडलेल्या दमदार पावसामुळे अग्रणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे अग्रणी नदीच्या बंधार्यावरून होणारी वाहतूक देखील ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील अनेक ओढे नाल्यांही पूर आला असून पुलावरून पाणी वाहू लागले आहे. जिल्ह्यातील मिरज, शिराळा, तासगाव, आटपाडी तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतीची कामे देखील ठप्प झाली आहेत.
कोल्हापुरातही पाऊस
कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातही धुवांधार पाऊस झाला. हंबरवाडी-बेरडवाडी रोडवर ओढ्यातून म्हैस वाहून गेली. ओढ्यावर ट्रॅक्टर आणि ट्रॉली देखील बांधून ठेवायची वेळ आली. आजही कोल्हापुरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील विविध भागात पाणी साचले आहे. तर, काही नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्येही पाणीही शिरले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शहरातील अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याची तातडीने दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून या विषयीची माहिती घेतली. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विस्कळीत झालेली वाहतूक तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.